The Sapiens News

The Sapiens News

उडता नाशिक ?

उडता नाशिक ?
ड्रग्ज, रॉलेट, स्टॅम्प घोटाळा, वाढती गुन्हेगारी, खून, आत्महत्या, खंडणी, प्रमाणपत्र घोटाळा ही नाशिकची ओळख ? की मंत्र, तंत्र, यंत्र, प्रभू श्रीरामचंद्रांच्या पादस्पर्शाने पावन झालेली, रेखीव मंदिरे व घाटांनी नटलेली संस्कार व संस्कृती ने अलंकृत झालेली पवित्रभूमी ही ओळख ?

समस्या नाशिकच्या
१ शाळा,कॉलेज बाहेर सर्रास प्रतिबंधित पदार्थ विक्री
२ बेकायदा हुक्का व मसाज पार्लर
३ खून, दरोडे, आर्थिक वाद फसवणूक
४ रोलेट, ऑनलाइन जुगार
६ जमिनीचे वाद
५ कोलमडलेली सामजिक व शासकीय यंत्रणा
६ बेकायदा धंदे
७ राजकारणाचे गुन्हेगारीकरण
८ अतिक्रमण व अनधिकृत वस्त्या
९ नियम कायद्याचा दुरूपयोग व पळवाटा
१० वाढती लोकसंख्या, वाढती गुन्हेगारी
११ सकारात्मक उपक्रमाचा अभाव
१२ गोदाघाटसारखा सुंदर प्रकल्प मद्यपींचा अड्डा
सर हे box मध्ये घ्या

आपणास या शिर्षकावरून उमजले असेल की या लेखाचा रोख कोणत्या दिशेने आहे. आपण उडता पंजाब हा सिनेमा पाहिला असेलच ज्यात अंमलीपदार्थां विषयीतची सामजिक समस्या दाखवण्यात आली आहे. पंजाबी समाज कसा ड्रगच्या विळख्यात सापडला असून या समाज पोखरणाऱ्या व्यसनाने देशात, क्रीडा कृषी, उद्योग क्षेत्रात प्रगत असलेला पंजाब प्रांत कसा टप्याटप्याने पण काहीच वर्षात खंगत गेला आणि आज एवढा प्रगत आधुनिक पंजाबी समाज मना मनात, घरा घरात, तुकड्या तुकड्यात उध्वस्त झाला. ज्या प्रांताच्या नावाने भारतीय सैन्यात अतिशय शौर्य व धाडसाचे प्रतीक म्हणून नावाजलेली शीख रेजिमेंट आहे. ज्या शिखांनी शौर्याच्या बाबतीत देशातच नाही तर आंतराष्ट्रीय स्तरावर देखील ज्या पंजाबी मातीचे नाव उज्वल केले आहे. त्याचीच आज माती झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे.
जर आपल्या पासून १५९७ किमी दूर असलेल्या प्रांताच्या उध्वस्त होण्याने आपल्याला एवढी हळहळ होत असेल तर आपल्या या पवित्र नाशिक मंत्रभूमीची अधोगती होणे तरी कसे स्वस्थ बसू देईल ?
काही वर्षांपूर्वी ह्याच आपल्या नाशिकचा तीर्थक्षेत्र म्हणून नावलौकिक होता. पण मागील काही वर्षात हे पवित्र तीर्थक्षेत्र वाईन सिटीने ओळखलं जाऊ लागलं. त्याच बरोबर भारतातील सर्वात मोठा तेलगी स्टॅम्प घोटाळा समोर आला. मग विविध प्रकारची गुन्हेगारी आणि आज सर्वात मोठा ड्रग्ज उत्पादक म्हणून ओळखू पाहत आहे. या गुन्हेगरीचे गांभीर्य जर नीट समजून घ्यायचे असेल तर पंजाब व नाशिकच्या ड्रग्जच्या कुव्यापारा बाबत मात्र एकच तुलना करावी लागेल. पंजाबमध्ये ड्रग्ज ही पाकिस्तानातून येत असते. अगदी सीमेपारवरून त्यामुळे ते भारतात पाठवणे आईएसआईएस व पाकिस्तानी एजन्सीजला खूप अवधड असते. तरी देखील जेवढीही ती भारतात पाठवली त्याने एक राज्य उध्वस्त होते. पण नाशिकचे सध्या गाजत असलेले ड्रग्जचे प्रकरण पंजाबपेक्षा ही जास्त घातक व गंभिर असल्याचे आम्हास वाटते आणि त्याच मुख्य कारण हे की येथे येणारी ड्रग्ज ही पाक मधून येत नाही ती येथेच बनवली जाते आहे. तीच उत्पादन हे आपल्या अंगणातच होत आहे. आता तुम्हाला या गुन्हेगारीची तीव्रता लक्षात आली असेल. याचाच दुसरा अर्थ हा होतो की मंत्रभूमी, पवित्रभूमी, प्रभूरामचंद्राच्या पादस्पर्शाने पावन झालेली ही नाशिकभूमी जी आज ड्रग्ज उधोगाची राजधानी बनू पहात आहे. तेलगी घोटाळ्यामुळे झालेली या नगरीची बदनामी कमी की काय आज या आपल्या पवित्र, सुंदर, स्वच्छ शहरास ड्रग उत्पादनाचा कलंक लागला आहे. आज नाशिक हे गुन्हेगारी, बेकायदा व अवैधधंदे, खून, दरोडे रोलेट ऑनलाइन जुगार, क्रिकेट बेटिंग यात राज्यातच नाही तर देशात नं १ होऊ पाहत आहे. तरुण मुले सर्रास गुन्हेगारी व्यसनाधीनतेकडे वाहवत जात आहे. एखाद्याचा खून करून रील बनवून समाज माध्यमांवर टाकणे आणि आम्ही मोठे शौर्य गाजवले अशा अविर्भावात बेपर्वा वक्तव्य करणे हे आज आपण पाहत आहोत. वर्तमानपत्र उधडल्यावर काही सकारात्मक वाचायला मिळेल याची शास्वती आज नासिककरांना राहिली नाही. रोज डजनभर गुन्हेगारीच्या घटना घडतात व आपल्याला वाचायला मिळतात. पण कधी विचार केला का या का घडतात ? या प्रश्नांचे सत्य व वस्तुनिष्ठ उत्तर हवे असेल तर गुन्हेगारांचा वयोगट व त्यांना गुन्हेगारीस प्रवृत्त करायला लावणारे घटक शोधणे क्रमप्राप्त होते ?
म्हणून या प्रश्नांची उत्तरे आपण एकत्रित पाहू. गुन्हेगारी करणारा वयोगट मुख्यत्वे करून १८ ते ३५ वर्षांचा आहे. पण याची सुरवात होते शालेय जीवनापासून विशेषतः १५,१६ व्या वर्षापासून अस समजा हा त्यांचा प्रशिक्षण कालावधी असतो. शाळेत गल्लीबोळात हिंडणारा कोवळा मुलगा शाळेजवळील गोळ्या भिस्किटाच्या दुकानातून मोठी मुले गुटका घेतांना पाहतो आणि कधी तो सिगारेट, बिडी, बिअरच्या नादाला लागतो हे त्याच त्यालाच कळतं नाही. अर्थात हे सगळं सुरवातीला फ्री मिळतं आणि अर्थपुरवठा होतो तो मित्रांकडून पण एकदा का हे व्यसन लागले की फ्रीचे बंद होते व पैसे शोधणे नव्हे चोरने सुरू होते. सुरवात बापाच्या वा आईच्या पाकिटापासून होते मग पैसे मिळतात तसे व्यसनही वाढत जाते आणि चोऱ्या व गुन्हेगारी ही. काही काळ हे लपून चालते पण नंतर राजरोस होते. कारण तोवर मुले उद्दाम व हाताबाहेर गेलेली असतात.
त्यात अनेक तर रोलेट ऑनलाइन जुगार खेळतात व कर्जबाजारी होतात. बापाला कर्ज काढून ते फेडावे लागते अथवा मुले आत्महत्या करता. दुर्दैव हे की याची कारणे अनेकदा लपविली जातात अथवा सत्य समोर येत नाही. तुम्हाला याची तीव्रता किती भयावह आहे हे मागील पाच वर्षात झालेल्या आत्महत्यांवरून लक्षात येईल आणि यात ऑनलाइन सेक्स सापळ्याचाही संबंध आहे. येथे विषय फक्त नाशिकचा आहे. दुर्दैव हे की या सर्वच बेकायदेशीर धंद्यांना काही गुन्हेगारी वृत्तीचे राजकीय नेत्यांशी सलगी असलेले लोक पोषण देतात. प्रसंगी ही मंडळी असल्या भटकलेल्या मुलांना पोलीस कारवाई पासून ही वाचवतात व नंतर त्यांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून घेतात. कारण संसाराचा गाडा कसाबसा ओढणाऱ्या बिच्याऱ्या दुबळ्या बापापेक्षा हा नेता अधिक पावरफुल असतो मग मुले यालाच आपला……मानू लागतात. त्यांच्यासाठी त्यांचा तो भाऊ, भाई, अण्णा, आबा, अप्पा, दादा, महाराज असतो. खरंतर तो मात्र बापच नसून देवच होतो निदान पुढील ४,५ वर्षे वर्षे तरी, कारण त्यापुढे त्या मुलाचा व्यसनाने वा वापराने पुरता चोथा झालेला असतो, दोनचार केसेस ही असतात अंगावर, तोवर मार्केटमध्ये नवीन पीक येत आणि हा आऊटडेटेड होतो.
या मुलांचं दुर्दैव हे की यांच्या अतिशय वाईट काळात समाजही त्यांना दूर लोटतो, दूषणे देतो, तुच्छ लेखतो अथवा हिनवतो मग ही गाडी अधिकच बेफाम होत जाते आणि कुठेतरी धडकते नी संपते अथवा रत्याच्या बाजूला पडून सडते गंजते.
म्हणून या त्यांच्या भावनिक अतिशय नाजूक वयात त्यांना हळव्या हाताने कवेत घेणारा त्यांना दुसरी संधी देणारा, समजून घेणारा हवा. जो काहींना मिळत नाही आणि ज्यांना मिळतो ते मात्र पुढील जीवनात कमालीचे यशस्वी होतात.
आज नाशिकच्या तरुणांना आदर्श वाटावी अशी व्यक्तिमत्वे कमी नाहीत परंतु ती एकतर समाज कार्यासाठी पुढे येत नाही अथवा इतरांच्या खोट्या प्रसिद्धीच्या गोंगाटात हरवली जातात. अनेक प्रभावी म्हणावी अशी विविध क्षेत्रातील दिग्गज गुणवंत मंडळी आपल्या नाशिकला लाभली आहे आणि त्यातील अनेक आज ह्यात ही आहेत. पण रंगमंचाच्या पडद्या आड. त्यातच आजची नाशिकचीच नाही तर जगभरची मुले थोडी दुर्दैवी म्हणावी कारण आजच्या उपभोक्तावादाने त्यांची स्वप्ने तर मोठी केली पण खिसे मात्र फाटकेच ठेवले आणि ज्यांना त्यात समतोल राखता येत नाही. मग ती मुळे नैराश्यात जातात वा गुन्हेगार होतात. अर्थात याला नाशिकची मुले ही कशी अपवाद असणार ?
त्यातच नाशिक हे पुणे मुबंई नंतरचे सर्वात जलद विकास होणारे व उत्तर महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील इतर व्यक्तींना रोजगाराची अपेक्षा वाढविणारे शहर ठरले आहे. त्यामुळे या शहरात रोज यात्रेत येतात तसे माणसांचे लोंढे उतरतात त्यात सर्वच सभ्य असतात असे नाही. हौसे, गवसे, नवसे असे विविध वृत्ती अपप्रवृत्तीचे लोक असतात त्यांच्यातील काहींचा शहराची गुन्हेगारी वाढविण्यास हात असतो. त्याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे शहराच्या मधोमध व अवतीभवती वाढणाऱ्या बेकायदेशीर वस्त्या व त्यामुळेच पोलीस विभाग, महानगरपालिका व इतरही शासकीय यंत्रणांवर आलेला अतिरिक्त ताण. जो प्रत्येक वाढत्या शहराला सोसावाच लागतो आणि त्याचा दुष्परिणाम हा शहराच्या कायदा व सुव्यवस्थेवर होतो. जी अबाधित राखण्याचे उत्तरदायित्व व जबाबदारी ही पोलीसांवर असते परंतु त्यासाठी आवश्यक असलेली अतिशय प्रभावी टिम ही कुटुंब, शाळा, महाविद्यालये, राजकीय इच्छाशक्ती, इतर शासकीय यंत्रणा यांच्या सहकार्यातूनच तयार होते हे ही विसरता काम नये. नाशिकची उडता पंजाब सारखी उडता नाशिक ही स्थिती होऊ द्यायची नसेल आजच प्रभावी पावले उचलावी लागेल आणि ती उचलण्याचे प्रथम कार्य हे जनतेलाच करावे लागेल कारण जनतेला जे चालते ती जे खपवून घेते तेच राजकारणी, पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था वा इतर शासकीय यंत्रणा करतात. म्हणून आजवेळ आली आहे प्रत्येक नाशिकराने उंबऱ्याच्या आत विचार न करता बाहेर येऊन कृती करण्याची.

उपाय : जर नाशिककरांना या शहाराची कायदा व सुव्यवस्था, पावित्र्य, लौकिक, निरामयता कायम ठेवायची असेल तर फक्त एकच रामबाण उपाय आणि तो म्हणजे शासकीय यंत्रणांना मात्र जाब विचारून वा दूषणे देऊन चालणार नाही तर त्यांच्या कामात सहकार्य करून या यंत्रणांशी सुसंवाद वाढवणे गरजेचे आहे. मात्र उंबऱ्याच्या आत्ता विचार करून चालणार नाही तर त्या बाहेर पडण्याची तयारी ही दाखवावी लागेल आणि जे ही सकारात्मक सामाजिक कार्य करीत आहे त्यांना साथ व हात द्यावा लागेल. आजही आपले नाशिक छान, सुंदर, सुसंस्कृत आहे. परंतु त्याची संकुचित होत चाललेली व्याप्ती वाढवण्यासाठी कुणीतरी नाही आपण सर्वांनीच पुढाकार घेणे आवश्यक आहे. आपल्यासाठी, आपल्या शहरासाठी, आपल्या पुढील पिढीसाठी.
शिरीष प्रभाकर चव्हाण
संपादक : दि सेपिअन्स
ईमेल : chavanshirish9@gmail.com

Leave a Comment

Vote Here

Loading poll ...
Coming Soon
Do You Like Our Website?
UPSE Coaching

Recent Posts