१९९५ साली माझगाव मधून साध्या नगरसेवक असलेल्या व नेत्यांच्या बैठकीत पाणी वाटत असतांना बाळासाहेबांनी उमेदवारी दिलेल्या बाळा नांदगावकरांनी भुजबळांना पाडले आणि ते २००४ मध्ये हक्काच्या मतदारसंघाच्या शोधात येवल्यात आले नी ते राजकीयदृष्ट्या येवलेकर झाले. अगदी सर्व जाती धर्माच्या लोकांनी त्यांना मनापासून स्वीकारले मग ते मराठा, माळी, वंजारी वा मुस्लीम धर्मीय असो. प्रत्येक निवडणुकीत भुजबळांना नवं आव्हान असतं प्रत्येक निवडणुकीत त्याच येणं अवघड आहे असच म्हंटल जात. अनेक प्रकारचं राजकारण जोमात होत, मधेच भ्रष्टाचाराचे आरोप ही होतात पण काही केले तरी भुजबळ निवडून येतात आणि नुसते येत नाही तर जोमात, मजबूत येतात.
पण भुजबळ का निवडणू येतात याच कारण तरी काय ?याचं एका वाक्यात उत्तर द्यायचं झालंच तर ते आहे. मतदारसंघातील विकास व प्रत्येकवेळी त्यांच्याकडून मांडण्यात आलेले निर्णयक आडाखे. जो येवला मतदारसंघ येवला, लासलगाव, विंचुर तसेच पातोदया सारखी असंख्य गावं यांनी मिळून तयार होतो. त्याने २००४ पूर्वी नक्कीच असा विकास कधीच पाहिला नव्हता. महत्वाचं म्हणजे भुजबळ हे व ते ज्या पक्षात आहे तो पक्ष २००४ पासून बहुतांश वेळी सत्तेत राहिला. त्याचा उपयोग अथवा हवेतर फायदा म्हणा कसा करून घ्यायचा हे छगन भिजबळांना नक्कीच जमले. असे नाही की मतदार संघात जातीचे राजकारण अथवा समीकरण त्यांच्याकडून व इतर ही पक्षाकडून बांधली जात नाही ती जात होती, जातात, पुढे ही जातील पण त्याला विकासाच्या आसना खाली कसं दडवायच हे राजकारणात आल्यावर शिकायची गरज कुणाल पडत नाही. तेच भुजबळांच्या बाबतीत झाले. येवला मतदारसंघात भुजबळांनी जो विलास केला तो त्यापूर्वी नक्कीच झाला नव्हता. रस्ते, पाण्याची सुविधा शेतीचे शेतकऱ्यांचे प्रश्न, आरोग्याच्या सुविधा, शासन दरबारी अडलेली काम, नवीन संकल्पना, स्थानिक पैठणी उद्योगाला प्रसिद्धी प्रोत्साहन त्यांच्या काळात मोठ्या प्रमाणात मिळाले. असे समजा नाशिक जिल्ह्यात येवला लासलगाव मतदारसंघातील मतदारांच्या आवाजाला मोठे वजन प्राप्त झाले. जे त्यापूर्वी क्वचितच होते. कारण मुंबईत हरल्यावर भुजबळ स्वगावी वा स्वगृही परतले ते एक सुरक्षित मतदारसंघाच्या शोधात. जो त्यांना येवल्याच्या रूपाने मिळाला. माजगावमध्ये हरलेले भुजबळ शरद पवारांच्या बारामती मतदारसंघासारखा एक पक्का व हक्काचा गड शोधीत होते आणि हक्काचा गड राजकारण करून नाही तर शास्वत विकास करून पक्का होतो हे एव्हाना भुजबळ राजकारणतूनच शकले होते. ज्यासाठी त्यांनी खरोखर कष्ट वेचले.
२००४ साला पर्यंत मागील दोन पंचवार्षिक आमदार असलेले लासलगावचे त्यावेळच्या शिवसेनेचे नेते कल्याणराव पाटील हे होते. तेही सलग दोन पंचवार्षिक परंतु २००४ पर्यंत मतदारसंघात मूलभूत कामेही व्यवस्थित नव्हती झाली हे तेथील मतदार सांगत. तसेच आमदारसाहेब भेटत ही नाही अशी तक्रार मतदारांची असे. मतदारसंघात मूलभूत सुविधांचा ही अभाव होता. मग विकास कामे तर विचारायलाच नको. आरोग्य सुविधा स्थानिकांचे प्रश्न याकडे हवे तसे लक्ष न दिल्याची ओरड मतदार करीत होते त्यातच हा मतदार संघ लासलगाव व येवला मिळून तयार होतो. मतदारसंघाचे नाव ही येवला मतदारसंघ पण येवला आकाराने व लोक संख्येने मोठा असूनही यात लासलगावलाच झुकते माप दिले जाते. अशी ओरड येवल्यातील मतदारांची असे. तसेच येवल्यात राजकीय प्रस्थ असलेली आंबादास बनकर, मारोतराव पवार, माणिकराव शिंदे, दराडे बंधू यांच्या सारखी राजकारण व समाजकरणातील दिग्गज मंडळी असूनही तसेच येवल्याला मोठा सांस्कृतिक वारसा असून ही न्याय मिळत नसल्याची भावना येवलेकरांची असे. तिला २००४ च्या भुजबळांच्या उमेदवारीने न्याय मिळाला असे म्हणता येईल. नी त्याच बरोबर येवल्यातही विकास सुरू झाला.
असे नाही की मतदारसंघात सर्वकाही आलबेल आहे वा समस्याचे १००% निराकरण झाले आहे. हो पण भुजबळांच्या गडाला सुरुंग लागेल अशी अजून तरी मोठी चिन्हे समस्या दिसत नाही. अर्थात येवला मतदारसंघात आजही भुजबळांची जादू आहे असेच वाटते. ती जादू शेजारील नांदगाव मनमाड मतदारसंघात त्यांचे पुतणे समीर भुजबळ cash करण्याचा नक्कीच प्रयत्न करतील परंतु तिचे सकारात्मक परिणाम येतील की नाही हे २० नोव्हेंबरला मतदारच ठरवतील. हे विधान संयमित असण्याचे कारण एकच ते म्हणजे समीर भुजबळ व स्वता छगन भुजबळ यांना देखील त्याची पुनरावृत्ती येवला मतदारसंघाबाहेर करता आलेली नाही उदा. नाशिक व नांदगाव विधानसभा व लोकसभा निवडणुक. भुजबळ हे महाराष्ट्रातील एक दिग्गज नेते आहे यात शंका जरी नसली तरी आजवर भुजबळांच्या बुरुजाला सुरुंग लावणारी व्यक्ती ही नेहमीच त्यांच्यापेक्षा वय, राजकीय, आर्थिक, सामाजिक दृष्ट्या कमी वा सामान्य राहिल्याचे दिसते, त्याचा राजकीय इतिहास हा बाळा नांदगावकर, हेमंत गोडसे यांच्या माध्यमातून सांगतो. त्याचीच पुनरावृत्ती मराठा आरक्षणाला विरोध व मनोज जारांगे, येवल्यातील मातब्बर स्थानिक माणिकराव शिंदे, दराडे बंधू, त्यातच शरद पवार यांचा रोष याचा ही विचार या निवडणुकीत स्वता भुजबळ यांनी केलाच असेल यात शंका नाही.
एक मात्र नक्की आजवर भुजबळांवर अनेक गंभीर आरोप झाले मग ते भ्रष्टाचाराचे, दमानींचे, तेलगी घोटाळ्याचे, आर्थिक अफरातफरीचे, अवाजवी संपत्ती जमा करण्याचे असो वा त्यांना जेल ही झालेली असो. परंतु येवलेकरांचे त्यांच्यावरील प्रेम मात्र कमी झालेले नाही हे आज तरी दिसते. येवला मतदारसंघात त्यांना प्रत्येक निवडणुकीत मतदारांनी भरभरून दिलं यातच सगळं आलं. शेवटी लोकशाहीत न्यायालय, पोलीस वा
कोणत्याही शासकीय यंत्रणांपेक्षा नागरिक व त्यांचा निर्णय मोठा असतो नाही का ? आणि आजवर तरी भुजबळांनी मतदारांचा विश्वास जिंकला असल्याचे दिसते. हो पण सदा सर्वकाळ जनतेचे मत व विचार तेच असतील असे ही नाही.