तुषार शेटे, न्यूज को. ऑर्डीनेटर, न्यूज18 लोकमत शिलाँग, ता. २ : पूर्वोत्तर राज्ये नैसर्गिकदृष्टया संपन्न जरी असली तरी देशातल्या अन्य राज्यांच्या तुलनेत विकासाच्या दृष्टीने मागासलेली आहेत आणि हे मागासलेपण अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या दृष्टीने सहज दूर करता येईल असा आत्मविश्वास ईशान्य परिषदेचे सचिव के. मोझेस चलाई, यांनी व्यक्त केलाय. डोंगररांगांनी वेढलेल्या ईशान्य भारतात तीव्र चढ उतार तर आहेतच मात्र मुसळधार पाऊस आणि कडक्याच्या थंडीमुळे इथे मोठमोठे उद्योग सुरू करणं हे आव्हानात्मक काम आहे.
मात्र भले मोठे उद्योग आणून विकासाचे ध्येय साध्य करण्यापेक्षा इंटरनेटवर आधारित माहिती व तंत्रज्ञाना संदर्भात व्यवसाय सुरू करण्याचे प्रयत्न असल्याची माहिती चलाई यांनी पत्रकारांना दिली. मुंबईतल्या पत्र सूचना कार्यालयाने आयोजित केलेल्या आसाम-मेघालय दौऱ्यावर असलेल्या महाराष्ट्रातल्या पत्रकारांनी शिलॉंग येथील ईशान्य परिषदेच्या कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
ईशान्य भारताचा कायापालट हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वप्न असून गेल्या 10 वर्षात विकासाचा वेग वाढला आहे. नव्या प्रकल्पांसाठी केंद्राकडून ३२०२ कोटींहून अधिक निधी मिळाला आहे. अनेक वैद्यकीय महाविद्यालयेही सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली.
विकास कामांचा वेग वाढला असला तरी अद्याप आर्थिक परिवर्तन हव्या त्या प्रमाणात झालेले नाही. अजूनही रोजगाराच्या संधी कमी आहेत. येथील युवकांमध्ये विकास घडवून आणण्याची पूर्ण क्षमता आहे, मात्र तंत्रज्ञान आणि गुंतवणूक आमच्या राज्यांत येणे आवश्यक आहे. आम्ही सध्या पर्यटन, क्रीडा या क्षेत्रांच्या विकासावर भर देत असल्याची माहिती मोझेस चलाई यांनी दिली.
ईशान्य भारतातील सर्व राज्यांमध्ये सामाजिक- आर्थिक विकास प्रकल्प राबविणे, ही या परिषदेवर जबाबदारी आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाचे या परिषदेवर नियंत्रण असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या परिषदेचे अध्यक्ष आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.
आजच्या ताज्या बातम्या, सर्व लाइव्ह न्यूज अपडेट्स, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 मराठीवर.