महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) पुढे ढकलण्यात आलेली महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा आता १ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे. कृषी सेवेच्या २५८ पदांचा समावेश याच परीक्षेत करण्यात येणार असून, उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी २१ दिवसांची मुदत दिली जाणार आहे.
एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे या बाबतची माहिती दिली. एमपीएससीतर्फे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ या परीक्षेचे आयोजन २५ ऑगस्टला करण्यात आले होते. मात्र, त्याच दिवशी आयबीपीएसचीही परीक्षा होती. त्यामुळे दोन स्पर्धा परीक्षा एकाच दिवशी नको, याच परीक्षेत कृषी सेवेच्या २५८ पदांचा समावेश करण्यासाठी स्पर्धा परीक्षार्थ्यांनी पुण्यात आंदोलन केले होते. या आंदोलनाला राजकीय वळण लागले होते. त्यामुळे राज्य शासनाने ही परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती एमपीएससीला केली होती. त्यानंतर एमपीएससीकडून संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ कधी आयोजित केली जाणार या कडे उमेदवारांचे लक्ष लागले होते.या अनुषंगाने आयोगाची २३ सप्टेंबर, २०२४ रोजी बैठक झाली. महाराष्ट्र कृषि सेवेतील पदांचा समावेश महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ मध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कृषि सेवेतील पदांचा तपशील आणि शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज सादर करण्याबाबतचे शुद्धिपत्रक लवकरच आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी २१ दिवसांचा कालावधी देण्यात येईल. अर्ज कालावधी, नव्याने अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या विचारात घेऊन प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका छपाईचा कालावधी, ऑक्टोबरमध्येमध्ये आयोजित इतर संस्थेच्या भरतीप्रक्रिये संदर्भात विविध परीक्षांचे वेळापत्रक, आगामी विधानसभा निवडणुकीची आचार संहिता व निवडणुकीचा अंदाजित कार्यक्रम इत्यादी बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा १ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे.