कला शिक्षक संजय जगताप यांचा कलाविष्कार
नाशिक
कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय गंगापूर रोड नाशिक येथे जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून विद्यालयाचे कलाशिक्षक संजय जगताप यांनी रेखाटलेल्या चिमण्यांचे चित्र प्रदर्शन प्रदर्शित करण्यात आले. प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले प्रसंगी पर्यवेक्षक धनंजय देवरे ज्येष्ठ शिक्षक नरेंद्र पाटील उपस्थित होते.प्रसंगी मुख्याध्यापक संजय पवार उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले की नेहमीच मनुष्यप्राण्याच्या सहवासात राहणारा निरागस पक्षी म्हणजे चिमणी…परंतु दुर्दैवाने या काँक्रीटच्या जंगलात चिमणी या पक्षाचा ऱ्हास होताना आपल्याला दिसतोय त्यामुळे चिमण्यांचं अस्तित्व आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे

म्हणून आपली सर्वांची जबाबदारी आहे की चिमणी दिनाचे औचित्य साधून चिमण्यांची संख्या कशी वाढेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कलाशिक्षक संजय जगताप यांनी आपल्या कुंचल्यातून वेगवेगळ्या रंगांचा वापर करून ३० ते ३५ चिमण्यांची चित्र रेखाटलेली आहेत यामध्ये चिमण्यांचे वेगवेगळे प्रसंग प्रदर्शित केलेले दिसतात. आपल्या कलाविष्काराबद्दल बोलताना संजय जगताप म्हणाले की आज वातावरणामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास झालेला आपल्याला दिसतोय आणि या कारणामुळे आपल्या नेहमीच सहवासात असलेल्या चिमण्यांची संख्या हळूहळू कमी होताना आपल्याला दिसत आहे. म्हणून विद्यार्थ्यांमध्ये याविषयी जनजागृती व्हावी त्यांच्या मनात चिमण्याविषयी एक प्रकारे जिव्हाळा निर्माण व्हावा हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून मी वेगवेगळ्या रंगछटा व प्रसंग विचारात घेऊन चिमण्यांचे चित्र रेखाटलेले आहेत. हे चित्र प्रदर्शन विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी आम्ही आयोजित केले. श्री जगताप यांच्या या उदात्त हेतूचे शाळा व्यवस्थापन विकास समितीच्या अध्यक्षा डॉ. योगिता अपूर्व हिरे, उपाध्यक्षा सुजाता शिंदे त्यांनी कौतुक करून शुभेच्छा दिलेल्या आहेत.सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन उपशिक्षक संजय बाविस्कर यांनी केले.
संपादक : शिरीष प्रभाकर चव्हाण : दि.सेपियन्स न्युज