महाराष्ट्र, कर्नाटकसह आंध्र प्रदेश राज्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री क्षेत्र जोतिबाची आज चैत्र यात्रा सुरू आहे. गुलाल, खोबऱ्याची उधळण करत गगनचुंबी सासनकाठ्यांनी आसमंत व्यापला. तर, देशभरातून आलेल्या पाच लाख भाविकांनी जोतिबाच्या चैत्र यात्रेला हजेरी लावली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं चोख नियोजन करण्यात आलंय. जोतिबा डोंगरावर जाणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी महाप्रसाद आणि शीतपेयाचं वाटप करण्यात येत आहे. अनेक स्वयंसेवी संस्थांनी स्वच्छता मोहीम राबवली. भक्तिमय वातावरणात जोतिबाची चैत्र यात्रा सुरू आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी अर्थात ज्योतिबा डोंगरावर गेली तीन दिवस चैत्र यात्रा सुरू आहे आजचा यात्रेचा मुख्य दिवस असून जोतिबा मंदिरात पहाटे 3 वाजल्यापासून धार्मिक विधी सोहळ्यास प्रारंभ झाला. पहाटे पाच वाजता महाभिषेक महापूजा, तर सकाळी 10 वाजता धुपारती पार पडली. हस्त नक्षत्रावर सायंकाळी 5.30 वाजता श्री जोतिबाचा पालखी सोहळा सुरू होतो. यात्रेत सहभागी होणारे भाविक गुलाल-खोबरे, बंदी-नाणी यांची पालखीवर उधळण करतात, अशी अनोखी परंपरा चैत्र यात्रेच्या निमित्तानं पाहायला मिळते.
तीन दिवस चालणाऱ्या केदारनाथ अर्थात जोतिबाच्या चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस आहे. पहाटे ५ वाजता शासकीय महाअभिषेक पार पडल्यानंतर देवाची राजदरबारी बैठी अलंकार महापूजा बांधण्यात आली. दुपारी 1 वाजता पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते मानाच्या सासनकाठ्यांचे पूजन पार पडल्यानंतर सासनकाठीच्या मिरवणुकीस पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून म्हालदार, चोपदार आणि तोफेच्या सलामीनं मिरवणुकीस प्रारंभ झाला. यासाठी मानाच्या १०८ सासनकाठ्या जोतिबावर दाखल झाल्या आहेत. यात्रेसाठी देशभरातून जोतिबा डोंगरावर आलेल्या भाविकांनी केलेल्या चांगभलच्या गजरानं अवघा डोंहगर दुमदुमून गेला.
यात्रेसाठी तब्बल आठ लाख भाविक ज्योतिबा डोंगरावर उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे. यामुळं चैत्र यात्रा सुरक्षित पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि व्हाईट आर्मीच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात आली आहे. चैत्र यात्रेसाठी आलेल्या लाखो भाविकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीसांनी सीसीटीव्ही कॅमेरा आणि ड्रोनची मदत घेतली आहे. यात्रेवेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्जआ आहे. सामाजिक सेवा आणि संस्थांच्यावतीनं डोंगरावर जाणाऱ्या मार्गावर आणि डोंगरावर ठिकठिकाणी मोफत अन्नछत्राचे आयोजन करण्यात आलं आहे. यासह एसटी महामंडळाच्यावतीनं २४ तास बससेवा सुरू ठेवण्यात आली आहे.