क्रीडाक्षेत्रा सारखं सुंदर, प्रेरणादायी आणि जीवनाला आकार देणार एक ही क्षेत्र नाही. परंतु त्याला लागलेली ही वाळवी स्वच्छ होणे हाच या लेखा मागचा उद्देश आहे.
1 मेहनतीच्या मानाने आउटपुट शून्य जे जगण्यासाठी खूप आवश्यक असते.
एक सामान्यतः अगदी सामान्य खेळाडू देखील जेवढी शारीरिक मानसिक मेहनत खेळामध्ये घेतो तेवढी मेहनत क्वचितच अभ्यासात देखील एखादा हुशार विद्यार्थी घेत असेल, त्याचप्रमाणे त्याच्याकडून अभ्यासात देखील हुशार असण्याची अपेक्षा केली जाते त्यात तो अनेकदा खरा उतरू शकत नाही. ज्या वेळेला मुले शाळेतून येऊन जेवून आराम करतात त्या वेळेला हा मैदानात जाण्याची तयारी करीत असतो ज्या वेळेला केवळ शाळेत जाणारी मुले आनंदासाठी खेळ खेळतात अभ्यास करतात जेवतात आणि झोपतात. त्यावेळेला एक खेळाडू त्याच्या मैदानावर रक्ताचा घाम आणि घामातून कौशल्य काढण्याचा जीवापाड प्रयत्न करीत असतो. तो जेव्हा घरी येतो त्या वेळेला त्याचा अभ्यास देखील राहिलेला असतो जेवण देखील राहिलेल असतं आणि हे सगळं करून त्याला कुठेतरी आरामाची आवश्यकता असते हे सर्व व्हायचं बाकी असताना त्याच्याबरोबरची केवळ शाळेत जाणारी सवंगडी गाड झोपलेली देखील असतात आणि ही मेहनत त्याला अतिशय लहान वयात घ्यावी लागते. ज्याची दखल क्वचितच नातेसंबंधात, शाळेत, समाजात व सामाजिक स्तरावर घेतली जाते आणि एवढी मेहनत घेऊन देखील बहुतांश खेळाडू हे क्लास थ्री वगैरे किंवा त्यापेक्षाही कमी नोकरी मिळवतात तीच त्याच्याबरोबर असलेली मुले ही केवळ अभ्यासात हुशार असल्याने विविध स्तरावर स्वतःला उच्च स्थानी स्थापित करून मोठ मोठ अधिकार पद मिळवितात.
2 खेळातील गलिच्छ राजकारण
एवढ्या मोठ्या प्रमाणात मेहनत घेऊन देखील अनेकदा स्पर्धकांच्या निवडीत क्रमांक देताना बहुतांश खेळाडूंवर अन्याय होतो त्यातही असे अनेक खेळ आहेत ज्यात खेळाडूच्या कौशल्यावर कमी आणि पंचांच्या मर्जीवर अधिक बक्षिसे दिली जातात जसे डायव्हिंग व इतर खेळ ही अनेकदा सांघिक खेळात किंवा वैयक्तिक देखील निवड करताना अन्याय केला जातो खूप जास्त अन्याय आणि हा अन्याय काही वेळा स्वतःच्या प्रशिक्षकाकडून आणि अनेकदा निवड समिती कडून केला जातो. त्यात जो खेळाडू सेवक किंवा पायाशी असेल किंवा ज्याच्या पालकांकडून अनेक प्रकारचे फायदे असतील अशा खेळाडूंना पदके, मान सन्मान दिला जातो. उच्च दर्जाच्या खेळाडूला देखील मान मिळतो. परंतु तो अपवादात्मक असतो व त्यासाठी अतिशय उच्च दर्जाचे कौशल्य स्थापित करावे लागते आणि तेथे पोहोचणे 99% खेळाडूंना शक्य होत नाही कारण शिखराच्या रस्त्यावरती अनेक मान अपमान डावलण्याचे अडथळे असतात आणि खेळाचे उच्च स्थान हे नेहमी पिरॅमिड सारखे असते शिखर निमुळते आणि पाया विस्तारलेला.
3 सदोष निवड प्रक्रिया विशेषता सांघिक खेळात
असे अनेक खेळ आहेत की जेथे पंचांन करवी तसेच संघटनात्मक पातळीवर उत्कृष्ट खेळाडूला डावलण्याची पद्धतशीर व्यवस्था केलेली असते आणि डावलले देखील जाते. अनेकदा निवड करताना चुकीच्या पद्धतीने चुकीच्या व्यक्तीची निवड केली जाते आणि उत्कृष्ट खेळाडूला नेहमीच स्थापत्य वागणूक दिली जाते डावलने हे खेळातील सदोष निवड प्रक्रियेचे अपत्य आहे.
4 शारीरिक व मानसिक घालमेल आणि घुसमट
बहुतांश खेळाडू जे उत्कृष्ट दर्जाचे असतात आणि त्यांना न्याय मिळत नाही जे अनेकदा होते. त्यामुळे खेळाडूची नियमित होणारी शारीरिक आणि मानसिक घालमेल आणि घुसमट हे नित्याचेच झाले आहे. आपला कोणताही दोष नसताना आणि आपण उत्कृष्ट असताना डावडल्या गेल्याचे शल्य हे शारीरिक आणि मानसिक स्तरावर खेळाडूत खूप अस्वस्थता निर्माण करते जिचा परिणाम त्याच्या मानसिकतेवर होऊन अनेकदा तो खेळाडूंना रस्त्यात देखील जातो आणि व्यसनाधीन देखील होतो अनेकदा अशा नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलले जाते जे त्या खेळाडूला देखील घातक असते किंवा उध्वस्त करणारे आणि हेच सत्य आहे. असे अनेक खेळाडू आहे जे कधीही समाजासमोर आलेले नाही आणि जे उत्कृष्ट होते ज्यांना व्यवस्थेने संपवले.
5 आर्थिक दृष्ट्या तोटा आणि मनस्ताप
खेळाडू वर त्याच्या कुटुंबाकडून जेवढा आर्थिक खर्च केला जातो तेवढा केवळ अकॅडमिक्समध्ये करिअर करणाऱ्या मुलावर होत नाही किंबहुना अकॅडमिक्समध्ये करिअर करणाऱ्या चार पाच मुलांचा खर्च हा एका खेळाडूवर करावा लागतो. ज्याने त्या खेळाडूच्या घरातील आर्थिक परिस्थिती जी आधीच कमकुवत असते ती कोलमडून पडते. ज्याचा परिणाम त्या घरावरही होतो आणि त्या खेळाडूच्या भावंडांवरती देखील अनेकदा खेळाडूचे पालक हे कर्ज काढून हा खर्च भागवता ज्याने ते घर अधिकाधिक आर्थिक दलदलीत फसत जाते. एवढे करून देखील खेळात होणारे राजकारण व नियोजन प्रक्रिया सदोष असल्याने या खेळाडूचे आयुष्य देखील उध्वस्त होते आणि त्याचबरोबर त्याच्या घराचे देखील.

6 बनावट प्रमाणपत्र व फसवणूक
सर्वाधिक बनवट प्रमाणपत्रांचे गलिच्छ प्रकार जर कुठल्या क्षेत्रात होत असेल तर ते क्रीडा क्षेत्रात होता. ज्याने कधी मैदानावर पाय देखील ठेवले नाही अशी मुले इकडनं तिकडनं क्रीडा प्रमाणपत्रे मिळवून अस्सल खेळाडूंच्या राखीव जागा घशात घालतात आणि हे राजरोसपणे चालते. आम्ही तर असे म्हणेल हा एक मोठा व्यवसाय असून यावर अनेक पदाधिकारी व काही प्रशिक्षक देखील गडगंज झाली आहेत. परंतु या लोकांना हे समजत नाही की ते एका उत्कृष्ट खेळाडूचा घास खाता आहेत. जो खेळाडू खेळात 100% दिल्याने अभ्यासात थोडे कमी गुण मिळवल्याने मागे राहतो आणि त्याला अधिक मागे करण्याचे काम किंवा पापकर्म ही मंडळी करतात. आज अनेक बनावट क्रीडा प्रमाणपत्रांचा प्रकार सामाजिक स्तरावर आपल्याला झालेला दिसतो. अनेक खोटी सर्टिफिकेट किंवा बनावट सर्टिफिकेट घेऊन खेळाडू नसलेली उमेदवार ही खेळाडू दाखवून खेळाडूंच्या नोकरी गिळकृत करतात. आणि बिचारे सामान्य खेळाडू हे हवाई चप्पल वर शासकीय कार्यालयाची उमरी झिजवत असतात.
7 भारतीय सामाजिक मानसिकता
या सर्व प्रकारात ज्वलनशील इंधन होते ती समाजाकडून मिळालेली अतिशय गलिच्छ निकृष्ट दर्जाची आणि जीव घेणे सामाजिक वागणूक. आपल्या समाजात आठवीला वर्गात पहिला नंबर वाल्याला मुलाला जेवढा मान दिला जातो तेवढा राष्ट्रीय पदक विजेते खेळाडूला दिला जात नाही खेळाडूला कमालीचे आणि निकृष्ट दर्जाचे महत्व असलेली भारतीय सामाजिक मानसिकता अथवा व्यवस्था हीच खरी भारताला क्रीडा क्षेत्रात निकृष्ट दर्जाचे स्थान मिळवून देण्यास कारणीभूत आहे. खेळाडूला आपल्या सामाजिक व्यवस्थेत क्वचितच मान दिला जातो. आणि दिला गेला तरी तो सर्वात शेवटच्या रांगेतला असतो. एक उत्कृष्ट खेळाडूची देखील सातत्याने तुलना इंजिनियर डॉक्टर किंवा वर्गात पहिला येणाऱ्या मुलाशी केली जाते जी सर्वार्थाने अयोग्य आहे. आमच्या मते खेळात आणि अभ्यासात जी ही मुले ज्या ही स्थानी आहेत ते त्या जागी आणि त्यांच्या मेहनतीने आहेत त्यांच्यात तुलना करणे हे अतिशय निंदनीय वर्तन आहे.
8 उरतात फक्त दुखापती व जखमा
एवढी सगळी मेहनत जी शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक स्तरावर घेतली जाते ती घेतल्यानंतर देखील म्हणावे तसे जीवनाचे गणित साध्य होत नाही आणि त्याचबरोबर खेळाडूंना अनेक दुखापतींना सामोरे जावे लागते ज्या डोके वर काढतात प्रौढ वयात किंवा वृध्दापकाळात आणि त्यावेळी नेमकी गंगाजळी नसते आणि गाठीशी पैसे देखील अनेकदा खेळाडू हे दुःख पदग्रस्त असून देखील किंवा त्यांना काही मोठा आजार होईपर्यंत दुर्लक्ष करतात याची प्रामुख्याने दोन कारणे दिली जाऊ शकतात एक सहनशक्ती अधिक असणे ती ही सामान्यांपेक्षा आणि दुसरे आर्थिक स्थिती कमकुवत असणे. एका खेळाडूला कुठले पदक मिळो ना मिळो नोकरी मिळो मिळो दुखापती या त्याला भेट म्हणून नक्की मिळता. ज्या अनेकदा त्याचं सर्वस्व संपुष्टात आणतात.
9 हुशार मुलांच्या तुलनेत स्थापत्य वागणूक
समाजाकडून नेहमी हुशार आणि मठ्ठ ही तुलना केली जाते. जी नेहमीच स्वतःस अतिशय हुशार समजणाऱ्या शिक्षण क्षेत्रातील मंडळी त्याचबरोबर सामाजिक स्तरावर स्थापित झालेल्या व्यक्ती नातेवाईक काही वेळेला कुटुंबातूनही केली जाते. याची सर्वाधिक बोच किंवा क्लेश हा सातत्याने खेळाडूच्या वाटेला येतो. अर्थात कोणाशीही कुणाबरोबर तुलना होऊ शकत नाही कारण क्षेत्र वेगळे असेल तर तुलना करणे मूर्खपणाचे असते परंतु ही मूर्ख सामाजिक व्यवस्था हे पापकर्म सातत्याने करीत असते तेही निरागस, गोजिरवाण्या आणि असाह्य असलेल्या लहानग्या मुलांची तसे पाहिले तर हुशार आणि मठ्ठ असे काहीही नसते जो जेथे आहे तेथे श्रेष्ठ असतो पक्षाला पोहता येत नाही माशाला उडता येत नाही म्हणून त्यांची तुलना देखील होऊ शकत नाही हे साधंच समीकरण सामाजिक स्तरावरती स्वतःस अतिशय हुशार समजणारे गाढवांना कळत नाही. आम्हाला तर एका निकृष्ट दर्जाच्या महिलेने मूत्रप्राशन करण्याचा सल्ला दिला होता का तर आम्ही दहावीला नापास झालेलो.
10 क्रीडा संघटनेत खेळाडूंपेक्षा श्रीमंतीला अधिक वाव असतो
असे म्हणतात. वाघाचा नेता वाघच व्हावा, गाढवाचा नेता गाढवाच व्हावा आणि शेळीचा नेता शेळीच व्हावा परंतु तसे न होता क्रीडा संघटनात बहुतांश राजकीय हस्तक्षेप असतो. ज्यांना खेळातील काहीही समजत नाही किंवा त्याविषयी आत्मीयता देखील नसते असे लोक अनेकदा क्रीडा संघटनांवर असतात विशेषतः ते असण्याचे ही काही शल्य नाही परंतु त्यांना त्या पदाला त्यांच्या राजकीय कामकाजाच्या दृष्टीने न्याय देता येत नाही व वेळ देखील त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रातली काही चापलूस गलिच्छ दांभिक निकृष्ट दर्जाची लोक यांना स्वतःहून आमंत्रित करतात. मोठमोठी पदे सन्मान दिले जातात अनेकदा क्रीडा स्पर्धा चालू असताना देखील त्या थांबवून आलेल्या नेत्याचा मान सन्मान वाढवला जातो. खेळाडूला जो देशासाठी घाम आणि रक्त जाळतो त्याला भ्रष्ट निकृष्ट लोकांपुढे अनेकदा नोकरी व अनेक कामांसाठी हात पसरावे लागतात ही शोकांतिका आहे. खेळाडूंची ज्या खेळाची संघटना मजबूत असते त्या खेळातील खेळाडूंना आर्थिक सामाजिक स्तरावर मानसन्मान मिळतो जो अजूनही आपल्या सामाजिक व्यवस्थेत वरील सर्व त्रुटींमुळे मिळणे अशक्य आहे.
ही व यासारखी अनेक कारणे आहेत. ज्यामुळे खेळातून खेळाडू म्हणून होरपळलेल्या व्यक्ती आपल्या मुलांना क्रीडा क्षेत्रात करिअर करण्यासाठी धजावत नाही किंवा त्याची हिंमत होत नाही आणि हे अतिशय जबाबदार पणे आम्ही सांगू इच्छितो कारण एक होरपळलेला व्यक्ती स्वतः कितीही होरपोळला असला तरी आपल्या मुलांना क्रीडा क्षेत्राला चिटकलेल्या या दूरगुणांच्या वृत्तीच्या आणि आत्मक्लेषाच्या आगीत होरपोळू देणार नाही आणि तेच खेळाडू आपल्या मुलांच्या दृष्टीने पाहतात.
टीप : लेखक स्वतः एक राष्ट्रीय पातळीवरील प्रशिक्षक व पदक विजेता खेळाडू असून गेली 40 वर्ष क्रीडा क्षेत्रात एक खेळाडू, प्रशिक्षक, पंच, क्रीडा लेखक, विश्लेषक, तज्ञ म्हणून क्रीडा क्षेत्रात काम पाहतात. ते स्वतः एन आय एस डिप्लोमा इन स्पोर्ट्स कोचिंग, एन आय एस सर्टिफिकेट कोर्स, बी. ए, बी पी एड, एम पी एड अशा विविध उच्च शैक्षणिक पदव्या धारण करते आहेत. तसेच त्यांनी भारतीय पारंपरिक खेळ व त्यामागील शास्त्र हे भारतीय पारंपरिक खेळांवर शास्त्रीय दृष्टिकोनातून प्रकाश टाकलेले पुस्तक देखील लिहिलेले आहे. त्याचबरोबर ते एका सरकार मान्य नोंदणीकृत वृत्तपत्र व वृत्त संकेतस्थळाचे मालक व संपादक देखील आहेत.
शिरीष प्रभाकर चव्हाण संपादक : दि. सेपियन्स न्यूज तथा
माहिती हक्क अधिकार कार्यकर्ता





