मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील “शासन आपल्या दारी” या उपक्रमाला प्रतिष्ठीत स्कॉच पुरस्कार (SKOCH Award) आज प्रदान करण्यात आला. देशभरातील विविध श्रेणीतील २८० प्रकल्पांमधून “शासन आपल्या दारी” च्या या महाराष्ट्राच्या मॉडेलची निवड करण्यात आली होती. शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या माणसापर्यत पोहोचवून त्याचे जीवन सुखकर करण्यासाठी हा उपक्रम मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाने वर्षभर यशस्वीरीत्या चालवून पाच कोटींहून अधिक लाभ नागरिकांच्या दारी पोहचविले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि पुढाकाराने राबविण्यात आलेल्या या उपक्रमासाठीचा पुरस्कार मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे प्रमुख डॉ. अमोल शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी ‘स्कॉच ग्रुप’ चे अध्यक्ष समीर कोचर, उपाध्यक्ष डॉ गुरुशरण धंजल, व्यवस्थापकीय संचालक दीपक दलाल उपस्थित होते.
शासन आपल्या दारीने सार्वजनिक सेवा वितरणातील उदाहरण निर्माण केले आहे. आता “शासन आपल्या दारी २.०” हे लक्ष्य असेल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे स्कॉच अवार्ड मिळाल्यावर व्यक्त केली आहे.
नागरिकांना शासनाचे विविध लाभ कुठल्याही अडथळ्याविना, सुलभरीत्या त्यांच्यापर्यंत मिळावेत म्हणून सुरु करण्यात आलेला हा उपक्रम यापुढेही असाच प्रयत्नपूर्वक राबविण्यात येईल. विविध शासकीय योजनांचे लाभ कोणत्याही अडथळ्याविना सर्वसामान्य नागरिकांना मिळावेत, त्यासाठी त्याना वारंवार सरकारी कार्यालयात चक्कर मारावी लागू नये, त्यासाठी नागरिकांच्या वेळेचा अपव्यय होऊ नये यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. आज या उपक्रमाला मानाचा स्कॉच पुरस्कार मिळणे ही निश्चितच आनंदाची आणि अभिमानाची बाब असून याद्वारे सार्वजनिक सेवांच्या यशस्वी वितरणाचे एक आदर्श उदाहरण देशासमोर आले आहे याचा सार्थ आनंद आणि अभिमान वाटत असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
गतवर्षी १५ मे रोजी सातारा जिल्ह्यातील पाटण येथून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला होता. महाराष्ट्राच्या या उपक्रमाने स्कॉच अवार्ड च्या नागरिक-केंद्रित प्रशासन या श्रेणीत ८० हून अधिक उपक्रमांना मागे टाकत अंतिम फेरी गाठून पुरस्कारही पटकाविला. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी “शासन आपल्या दारी” च्या प्रत्येक उपक्रमाला व्यक्तिश: हजेरी लावली होती. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी देखील हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे.
मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव डॉ अमोल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष स्थापन करून समर्पित टीम तयार करून हा उपक्रम राबविण्यात आला. राज्यातील सर्व जिल्ह्यात शासन आपल्या दारीचा उपक्रम प्रचंड प्रतिसादात पार पडला.