सदर लेख हा लेखकांचे मत आहे त्याशी The Sapiens News सहमतचं असेल असे नहीं
“कोणताही आजार झाला तर चर्चमध्ये या, येशू बरे करेल.” “पूर्वी या माणसाला किडनी नव्हती, येशूने किडणी दिली.” “येशूने त्याच्या रक्ताने मला पवित्र केलंय.” “ही बाई अपंग होती, व्हिलचेअरवर चालायची, पण येशूचा चमत्कार पाहा! ती आता धावायला लागलीय. आरारारारारा….” असे व्हिडिओ तुम्ही सोशल मिडियावर पाहिले असतील. अंगात आलेलं भयंकर भूत येशूच्या नावाने उतरवताना तुम्ही बघितलं असेल. चित्र-विचित्र चाळे, वेड्यागत नाचणं, असुरी पट्टीत बोलणं, आक्राळ-विक्राळ हावभाव करुन हे देवाच्या पुत्राचे भक्त असल्याचा दावा करतात हे विशेष. कदाचित अंधश्रद्धा निर्मूलनवाले ख्रिस्तांधळे असतील म्हणून त्यांना कदाचित या गोष्टी दिसत नसाव्यात. पण तुम्हाला नक्कीच दिसत असतील.
हे मिशनरी अनेकदा शहरांमध्ये रेल्वे स्टेशनच्या बाहेर, सोसायट्या, रस्ते आणि गर्दीच्या ठिकाणी दिसतात. गाव आणि जंगली भागातंही हे प्रचार करत असतात. आपल्या धर्माचा प्रचार करणे यावर आक्षेप नसून लोकांना मूर्ख बनवून, फसवून, लालुच देऊन ख्रिस्ती बनवण्यावर आक्षेप आहे. सुरुवातीला हे आर्थिक मदत करत असले तरी कुणीही आयुष्यभर पुरुन उरत नाही, हे धर्मांतर करणार्यांनी लक्षात घ्यायला हवे.
दुसरी गोष्ट म्हणजे अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश प्रशासनाला नवीन निर्देश दिले आहेत. ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतरही अनुसूचित जाती (एससी) म्हणून लाभ घेणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेशातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. धर्मांतरानंतर एससी दर्जा टिकवून ठेवणे म्हणजे संविधानाशी केलेली फसवणूक आहे, अशा कठोर शब्दांत न्यायालयाने सुनावले आहे. यामध्ये एक महत्त्वाची बाब लक्षात घेतली पाहुजे की धर्मपरिवर्तन केल्याने आधीच्या धर्माचा लाभ घेता येत नाही. न्यायालयाने अनुसूचित जाती आदेश, १९५० मधील तरतुदींचा उल्लेख करत म्हटले हिंदू, शीख किंवा बौद्ध यांव्यतिरिक्त इतर धर्म स्वीकारणाऱ्यांना एससी म्हणून मान्यता मिळू शकत नाही. २०२४ मधील सर्वोच्च न्यायालयाच्या सी. सेल्वारानी निर्णयाचा उल्लेख करत न्यायालयाने म्हटले की फक्त लाभ मिळवण्यासाठी केलेले धर्मांतर ही “संविधानाची फसवणूक” आहे. तसेच न्यायालयाने इतरही प्रकरणांचा उल्लेख करत यावर अधिक प्रकाश टाकला आहे. बर्याचदा लोक छोट्याशा आमिषासाठी धर्मपरिवर्तन करतात आणि कागदावर मात्र आपल्या जुन्या अनुसूचित जातीचा उल्लेख करतात, जेणेकरुन तो लाभ त्यांना मिळावा. मात्र ही केवळ धर्माची फसवणूक नसून संविधानाचीही फसवणूक आहे.
आणखी एक मुद्दा असा की हिंदू धर्मातून गेल्यावर कोणत्याही व्यक्तीच्या किंवा कुटुंबाच्या जीवनात बदल घडत नाही. त्यांची आर्थिक, सामाजिक, अध्यात्मिक उन्नती होत नाही. उलट जी सूट आणि निरपेक्षता हिंदू धर्मात असताना मिळत होती, ती इतर धर्मांत गेल्यावर मिळत नाही आणि एक बंदिस्तपणा येतो. वैचारिक व अध्यात्मिक सीमा आकुंचित होत जाते. हिंदू धर्मात नवीन तत्वज्ञान प्रवेश करण्याची मुभा असते, तीही जाते. उदा. जैन, बौद्ध अशी नवी मते विकसित होत जातात. मात्र हिंदू धर्मातून दुसर्या धर्मात गेल्यावर केवळ एकाच दैवी पुस्तकाला मानावे लागते. तसेच आपण आपल्या भारतीय मूल्यांपासून दूर जातो. आपली पुण्यभूमीची व्याख्या बदलत असल्याने आपले भावनिक राष्ट्रांतर घडते. आपण हिंदू धर्माचा द्वेष हा हेतू घेऊन आजीवन जगत राहतो आणि आपल्या पुढच्या पिढ्यांवरही तसेच संस्कार करीत जातो. यामुळे आपले नैतिक अधःपतन होते. मात्र हिंदू धर्मात राहूनच आपण आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढा देत राहिलो तर आपली उन्नती खुंटत नाही. आता अस्पृश्यता राहिलेली नाही. यापुढे थोडे फार भेद आहेत तेही मिटतील. पण विचार करा, जर भारतात बहुंसख्य हिंदू नसते तर संविधान आपल्याला लाभले असते का? गौतम बुद्धांचे विचार आनंदाने नांदू शकले असते का? आपल्या शेजारच्या धर्मांध राष्ट्रांकडे नजर फिरवली तरी भारतात आपण किती सुरक्षित आहोत याची आपल्याला जाणीव होईल. त्यामुळे दुःख, गरीबी, शारीरिक पीडा यांना कंटाळून किंवा लालूच पाहून धर्मांतर कधीही करु नका. अर्धे जग दोन धर्मांत तलवारी आणि बंदुकीच्या धाकावर विभागले गेले असले तरी भारत अभिमानाने उभा आहे, आपल्या हिंदू संस्कृतीचा जयजयकार आज जगभरात होत आहे. म्हणूनच मिशनर्यांच्या विळख्यात जाऊ नका. अभिमानाने जगा, स्वाभिमान सोडू नका. हिंदू म्हणून जन्मलात यासाठी प्रत्येक श्वासागणिक विश्वेश्वराचे आभार माना.
लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री
हिंदुस्थान पोस्ट




