महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळशी संलग्न सर्व उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील फेब्रुवारी–मार्च २०२६ या कालावधीत होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेसाठीची प्रवेशपत्रे (हॉल तिकीट) १२ जानेवारीपासून ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
राज्य मंडळाच्या www.mahahsscboard.in आणि http://www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर ॲडमिट कार्ड या लिंकद्वारे सर्व विभागीय मंडळांतील विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे डाउनलोड करता येणार आहेत. प्रवेशपत्रांची प्रत काढून विद्यार्थ्यांना देण्याची जबाबदारी संबंधित उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांवर असणार आहे.
यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क घेऊ नये, असे मंडळाने स्पष्ट केले आहे. प्रिंट काढलेल्या प्रवेशपत्रावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांनी शिक्का उमटवून स्वाक्षरी करणे बंधनकारक आहे. प्रवेशपत्रामधील नाव, आईचे नाव, जन्मतारीख किंवा इतर तपशीलांमध्ये चूक असल्यास ऑनलाईन पद्धतीने विहित शुल्क भरून विद्यार्थ्यांना दुरुस्ती अर्ज सादर करावा लागणार आहे. विभागीय मंडळाच्या मान्यतेनंतर सुधारित प्रवेशपत्रे ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विषय किंवा माध्यम बदलासाठी संबंधित विभागीय मंडळाशी प्रत्यक्ष संपर्क साधण्याचे आदेश राज्य मंडळाने दिले आहेत.




