The Sapiens News

दि.सेपिअन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपिअन्स न्युज

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील वाहतूक हळूहळू सुरू

मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटात बोगद्यानजीक मंगळवारी सायंकाळी ५ वाजता गॅस टँकरचा अपघात झाला. गॅस टँकर उलटला आणि ज्वलनशील प्रोपोलिन गॅसची मोठी गळती झाली. त्यानंतर तातडीने महामार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे वाहतूक जुन्या मुंबई – पुणे महामार्गाने वळविण्यात आली. द्रुतगती महामार्गावरील वाहतूक मोठ्या संख्येने जुन्या महामार्गाने वळविल्याने खोपोलीपासून पुढे २० किमीपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या. अजूनही जुन्या महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. परिणामी, वाहनाचालक-प्रवासी, रुग्ण, विमानतळावर पोहचण्यासाठी निघालेल्या प्रवाशांचे हाल झाले. मंगळवारी ५ वाजल्यापासून बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंत महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. आता गॅस गळती रोखण्यात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) यश आले आहे.

गॅस गळती झाल्याबरोबर एमएसआरडीसीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) पथकाला पाचरण केले. मात्र गॅस गळती रोखणे त्यांना शक्य झाले नाही. अत्यंत अवघड, आव्हानात्मक काम असल्याने या क्षेत्रातील तज्ज्ञांची गरज भासली. ही बाब लक्षात घेऊन एमएसआरडीसीने भारत पेट्रोलियम काॅर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल), हिंदुस्थान पेट्रोलियम काॅर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) आणि रिलायन्स कंपनीतील संबंधित तज्ज्ञांना बुधवारी सकाळी बोलवले. तज्ज्ञांचे पथक आल्यानंतर त्यांनी गॅस गळती रोखण्याच्या कामाला सुरुवात केली.

दुपारी ३ वाजता गॅस गळती रोखण्यात तज्ज्ञांच्या पथकाला यश आले. गॅस गळती रोखल्यानंतर गॅस टँकर हटविण्याच्या कामाला आता सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी आवश्यक ती यंत्रसामग्री मागवण्यात आली आहे. दोन तासात टँकर हटवण्यात येईल. त्यानंतर सायंकाळी ६ वाजल्यानंतर वाहतूक सुरळीत होईल, अशी माहिती एमएसआरडीसी (पुणे) अधीक्षक अभियंता राहुल वसईकर यांनी दिली. बुधवारी सायंकाळी ६ वाजल्यानंतर दोन्ही दिशेने वाहतूक सुरू होईल. मात्र आजघडीला ९ ते १० किमी लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे आज कोणीही मुंबई – पुणे प्रवास करू नये, गरज असल्यास पर्यायी मार्गाचा वापर करावा, असा पुनरुच्चार वसईकर यांनी केला. सायंकाळी महामार्गावरील वाहतूक सुरू होणार असली तरी वाहतूक नियमित होण्यासाठी आणखी काही वेळ लागण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे गुरुवारी सकाळपासूनच वाहतूक नियमित, सुरळीत होण्याची शक्यता आहे.