The Sapiens News

दि.सेपिअन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपिअन्स न्युज

मालेगाव तालुक्यातील महिला बचत गटांसाठी ग्रामस्तरीय कृषी अवजारे बँक स्थापनेची संधी

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2
मालेगाव तालुक्यातील महिला बचत गटांसाठी
ग्रामस्तरीय कृषी अवजारे बँक स्थापनेची संधी

मालेगाव, दि. 20 ऑगस्ट, 2026 (उमाका वृत्तसेवा): नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत मालेगाव तालुक्यातील १४२ गावांमधील उमेद (MSRLM) अथवा माविम (MAVIM) पुरस्कृत महिला बचत गट व महिला ग्राम संघांना गावपातळीवर ‘ग्रामस्तरीय कृषी अवजारे बँक’ स्थापन करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या योजनेत कृषी अवजारांसाठी प्रकल्प किमतीच्या ६० टक्के, कमाल २४ लाख रुपयांपर्यंत, तर कृषी ड्रोनसाठी स्वतंत्र घटकांतर्गत ६ लाख रुपयांपर्यंत अनुदान उपलब्ध आहे. पात्र महिला गटांनी ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत FPO-DBT  https://dbt.mahapocra.gov.in/  या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी भगवान गोरडे यांनी केले आहे.

गावपातळीवर आधुनिक कृषी यंत्रसामग्री व अवजारे भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांचा शेतीचा खर्च व श्रम कमी करणे, वेळेत आणि अचूक शेतीकाम उपलब्ध करून देणे तसेच उत्पादकता व नफा वाढविणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. यासोबतच शेती क्षेत्रातील महिलांचा सहभाग वाढवून त्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासही या योजनेमुळे मदत होणार आहे.

अवजारे बँकेसाठी २४ लाखांपर्यंत अनुदान
योजनेअंतर्गत पात्र महिला गटांना कृषी अवजारे बँक स्थापनेसाठी प्रकल्प किमतीच्या ६० टक्के अनुदान मिळणार असून त्याची कमाल मर्यादा २४ लाख रुपये आहे. यामध्ये ट्रॅक्टर, पॉवर टिलर, नांगर, डिस्क प्लाऊ, कल्टिव्हेटर, हॅरो, लेव्हलर, रोटाव्हेटर, सब-सॉयलर, बीबीएफ पेरणी यंत्र, सीड कम फर्टिलायझर ड्रिल, झिरो टिल ड्रिल, विविध प्रकारचे प्लांटर आदी यंत्रसामग्रीचा समावेश करता येणार आहे.

कापणी व मळणीसाठी क्रॉप रीपर कम बायंडर, कॉम्बाईन हार्वेस्टर, मॉवर, बटाटा डिगर, ऊस व कांदा कापणी यंत्र, थ्रेशर, मल्टीक्रॉप थ्रेशर, चाफ कटर, मका शेलर आदी यंत्रेही घेता येणार आहेत. तसेच पिक संरक्षणासाठी विविध प्रकारचे स्प्रेअर, पॉवर स्प्रेअर, ट्रॅक्टर ऑपरेटेड स्प्रेअर व बूम स्प्रेअर उपलब्ध करून देता येतील.

ड्रोनच्या माध्यमातून आधुनिक कृषी सेवा
कृषी ड्रोन हा स्वतंत्र घटक असून त्यासाठी प्रकल्प किमतीच्या ६० टक्के किंवा कमाल ६ लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. महिला बचत गटांना ड्रोनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिकांवर फवारणी, पीक पाहणी, सर्वेक्षण व मॅपिंग यांसारख्या आधुनिक कृषी सेवा उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.
याशिवाय पशुखाद्य व शेती अवशेष व्यवस्थापनासाठी बेलर, फोरेज हार्वेस्टर, वुड चिपर, कॅटल डंग कलेक्टर आदी यंत्रे तसेच इंटर रो वीडर, हेज कटर, पोस्ट होल डिगर, चेक बेसिन फॉर्मर आदी विशेष यंत्रांचाही अवजारे बँकेत समावेश करता येणार आहे.

किमान १० महिला सदस्यांची आवश्यकता
या योजनेसाठी मालेगाव तालुक्यातील उमेद (MSRLM) किंवा माविम (MAVIM) पुरस्कृत महिला बचत गट अथवा महिला ग्राम संघ पात्र आहेत. गटामध्ये वेगवेगळ्या कुटुंबातील किमान १० महिला सदस्य असणे आवश्यक आहे. गटाचे भागभांडवल व उलाढाल प्रकल्प किमतीच्या किमान ५ टक्के असणे बंधनकारक आहे.गटाचा मागील एक वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल उमेद/माविमच्या प्रमाणपत्रासह सादर करावा लागेल. यापूर्वी कोणत्याही योजनेतून कृषी अवजारे बँकेचा लाभ घेतलेला नसल्याबाबत गटाचे हमीपत्र, गटाच्या सर्वसाधारण सभेचा ठराव, ग्राम कृषी विकास समितीचा मंजुरीचा ठराव, नोंदणी प्रमाणपत्र, सभासद यादी, प्राधिकार पत्र तसेच सभासद वेगवेगळ्या कुटुंबातील असल्याचे हमीपत्र आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. एका गावातून एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास पात्र अर्जदारांची निवड जिल्हास्तरावर ऑनलाईन लॉटरी पद्धतीने करण्यात येणार आहे. तसेच २० लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा प्रकल्प असल्यास बँक कर्ज घेणे बंधनकारक राहणार आहे.

अर्ज प्रक्रिया, पात्रता व आवश्यक कागदपत्रांबाबत अधिक माहितीसाठी संबंधित गावातील सहाय्यक कृषी अधिकारी किंवा मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. मालेगाव तालुक्यातील पात्र महिला बचत गटांनी या अभिनव उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घेऊन गावपातळीवर आधुनिक कृषी यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी श्री. गोरडे यांनी केले आहे.

ही बातमी पुढील कार्यालयाकडून प्राप्त झाली असूनउप माहिती अधिक माहितीसाठी संबंधित कार्याला संपर्क साधावा.
नवीन तहसिल कार्यालयाची प्रशासकीय इमारत
दुसरा मजला, कॅम्प रोड, मालेगाव जि. नाशिक
दूरध्वनी क्र. 02554-250755
E Mail- siomalegaon03@gmail.com