सीए इंटरमीडिएट परीक्षेत नाशिकच्या साक्षी चांडकची देशपातळीवर गरुड झेप; मिळवला ‘ऑल इंडिया पहिला क्रमांक’
नाशिक / इगतपुरी: द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे (ICAI) नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या ‘सीए इंटरमीडिएट’ (CA Intermediate) सप्टेंबर २०२६ च्या परीक्षेत महाराष्ट्राने देशात पुन्हा एकदा आपला डंका बजावला आहे. मूळच्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील रहिवासी असलेल्या साक्षी प्रकाश चांडक हिने या अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या परीक्षेत देशात प्रथम क्रमांक पटकावून ऐतिहासिक यश संपादन केले आहे. मुंबईच्या नील राजेश शाह याच्यासोबत तिने ५०२ गुण मिळवत (८३.६७%) संयुक्तपणे ‘ऑल इंडिया रँक १’ (AIR 1) संपादन केला आहे. सीए इंटरच्या राष्ट्रीय गुणवत्तेत प्रथम येणारी साक्षी ही नाशिक जिल्ह्यातील पहिलीच विद्यार्थिनी ठरली आहे.
कष्टाचे चीज आणि जिद्दीचा प्रवास
साक्षी चांडक हिने पहिल्याच प्रयत्नात दोन्ही ग्रुप्स उच्च गुणांसह यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत. तिला मिळालेल्या गुणांमध्ये अकाउंटन्सी विषयात ८६ तर ऑडिट विषयात तब्बल ९५ गुण मिळाले आहेत. तिच्या या यशामागे प्रचंड मेहनत आणि काटेकोर नियोजन आहे. परीक्षेच्या तयारीबद्दल बोलताना साक्षीने सांगितले की, ती दररोज १४ ते १६ तास नियमित अभ्यास करायची. यात ९ तास क्लास आणि त्यानंतर घरी ५ ते ६ तास उजळणी व स्वाध्याय असा तिचाित्यक्रम होता. विशेष म्हणजे, कठीण संकल्पना समजून घेण्यासाठी आणि केस स्टडीजसाठी तिने पारंपारिक अभ्यासासोबतच कृत्रिम बुद्धिमत्तेची (AI) सुद्धा मदत घेतली होती.
शैक्षणिक पार्श्वभूमी व कुटुंब
साक्षीचे कुटुंब इगतपुरी येथे राहते. तिचे वडील प्रकाश चांडक यांचा कापडाचा व्यवसाय आहे, तर आई पूनम चांडक या गृहिणी आहेत. घरात सनदी लेखापाल (CA) क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसताना साक्षीने आपल्या जिद्दीच्या बळावर हे शिखर गाठले आहे. यापूर्वीही तिने शालेय आणि उच्च माध्यमिक पातळीवर चमकदार कामगिरी केली होती. दहावीच्या बोर्ड परीक्षेत ९७.४ टक्के गुण मिळवून तिने शाळेत टॉप केले होते, तर बारावीच्या परीक्षेत ९४.३३ टक्के गुणांसह ती नाशिक जिल्ह्यात चौथ्या स्थानी राहिली होती.
सोशल मीडियापासून दूर राहून यश
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर राहून, केवळ ध्येयावर लक्ष केंद्रित केले तर कोणतेही ध्येय गाठणे अशक्य नाही, हे साक्षीने सिद्ध करून दाखवले आहे. तिच्या या यशाबद्दल इगतपुरीसह संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून तिच्यावर अभिनुकाचा वर्षाव होत असून, महाराष्ट्राच्या या होतकरू कन्येने संपूर्ण राज्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केले आहे.




