वडाळा गावातील जय मल्हार कॉलनी येथे कुटुंब धार्मिक यात्रेसाठी गेले असताना चोरट्यांनी घर फोडून 1.68 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. कुटुंबीयांनी दागिने फ्रीजरमध्ये लपवून ठेवले असतानाही चोरट्यांनी ते शोधून चोरण्यात यश मिळवले. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नरेंद्र वनवे (54) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 3 जून ते 5 जून दरम्यान त्यांची नातेवाईक अनिता पिंगळे यांच्या घरी ही चोरी झाली. पिंगळे कुटुंबीय 3 जूनच्या रात्री जगन्नाथ पुरी येथे गेले होते. 5 जून रोजी पहाटे 1 वाजता त्यांचे जावई आशुतोष लेंडे हे पुण्याहून आले आणि त्यांनी चावीचा वापर करून घरात प्रवेश केला. चोरीचा संशय आल्याने त्यांनी तत्काळ कुटुंबीय व पोलिसांना माहिती दिली.
पाहणी केली असता, पोलिसांना कपाट उघडे, मागील दरवाजाची कडी, आणि टेरेसचा लोखंडी दरवाजा उघडा, भिंतीचा काही भाग तुटलेला आढळून आला. टेरेसच्या दरवाजातून चोरट्यांनी आत प्रवेश केल्याचे समजते. पिंगळे कुटुंबीयांनी लेंडे यांना फ्रीझर तपासण्यास सांगितले, तेव्हाच दागिने गायब असल्याचे समजले. या प्रकरणाचा तपास मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निसार शेख करीत आहेत.