आदिवासी समुदायांसाठीचे महत्त्व: मध्य भारतातील आदिवासी जमातींसाठी मोहा केवळ एक झाड नव्हते, तर त्यांचे सुपरमार्केट, बँक आणि लाईफ इन्शुरन्स होते. त्याच्या फुलांपासून अन्न आणि पारंपरिक मद्य बनवले जायचे, बियांपासून तेल काढले जायचे आणि पानांपासून पत्रावळ्या बनवल्या जायच्या. दुष्काळाच्या काळात सुकलेली फुले अन्नाचा मुख्य आधार असायची. इतकेच नाही तर अनेक ठिकाणी वस्तू-विनिमयासाठी (Barter System) मोहाच्या फुलांचा वापर केला जायचा.
ब्रिटिश काळातील बंदी आणि राजकारण: ब्रिटिश राजवट येण्यापूर्वी ही संपूर्ण मोहा अर्थव्यवस्था प्रामुख्याने महिला चालवत असत. हे मद्य गावांमध्येच तयार होऊन तिथेच विकले जात असल्याने यावर ब्रिटिश सरकारचे कोणतेही नियंत्रण किंवा कर (Tax) नव्हता. आपल्या महसुलाला (Revenue) मिळणारे हे आव्हान पाहून इंग्रजांनी याला “धोकादायक अंमली पदार्थ” घोषित केले आणि त्यावर कडक उत्पादन शुल्क (Excise Law) आणि परवाना पद्धती लागू करून बंदी घातली.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पुनरागमन: आज महुआला जागतिक स्तरावर एक ‘प्रीमियम प्रॉडक्ट’ म्हणून नवी ओळख मिळत आहे. आधुनिक डिस्टिलरीज (दारू कारखाने) चांगल्या डिस्टिलेशन तंत्रज्ञानाचा आणि आंतरराष्ट्रीय ब्रँडिंगचा वापर करून हे उत्पादन पुन्हा लाँच करत आहेत. ज्या महुआला एकेकाळी ‘देशी दारू’ म्हणून हिणवले गेले, ते आज लंडनच्या प्रीमियम बार्समध्ये विकले जात असून १०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त मोठी बाजारपेठ असलेल्या जागतिक स्पिरिट इंडस्ट्रीमध्ये आपले स्थान निर्माण करत आहे.




