नाशिक, दि. 26 (जिमाका वृत्तसेवा) : प्रशासनातील माणुसकी आणि संवेदनशीलतेचा संगम गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पहावयास मिळाला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी दाखविलेल्या संवेदनशीलता आणि तत्पुरतेमुळे देवळाली येथील भीमाबाई सुरंजे आणि त्यांचे पती गंभीरचंद सुरंजे यांच्या मालकीच्या जमिनीचा प्रश्न जागेवरच सोडविला. याबरोबरच सुरंजे दाम्पत्याने गतिमान प्रशासनाचा अनुभव घेतला. सरकारी काम आणि सहा महिने थांब हा शब्द प्रयोग विसरायला लावणारी ही घटना घडली आहे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
त्याचे झाले असे की, देवळाली येथील भीमाबाई गंभीरचंद सुरंजे यांच्या मालकीची मिळकत आहे. सदरची मिळकत भोगवटादार वर्ग दोनमधून भोगवटादार वर्ग 1 (क वर्ग सत्तप्रकार) मध्ये रुपांतरित करण्यासाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला होता. त्यासाठी त्यांच्याकडून पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार आपल्या प्रस्तावावर काय कार्यवाही झाली, याची माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्या चढत होते. वयोमानामुळे पायऱ्या चढताना त्यांना धाप लागली असावी. त्याच वेळेस जिल्हाधिकारी श्री. प्रसाद पायऱ्या उतरत होते. त्यांनी श्री. सुरंजे यांची आस्थेवाईकपणे विचारपूस सुरू केली. त्यांची विचारपूस करीत असताना श्री. सुरंजे यांचा विषय जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांच्या लक्षात आला. त्यांनी श्री. सुरंजे यांना पायऱ्या चढून वर जाण्याची आवश्यकता नाही, असे सांगत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील वडाच्या झाडाखाली असलेल्या पारावर बसविले. जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी तेथूनच निवासी उपजिल्हाधिकारी श्री. राजपूत यांच्याशी संपर्क करीत लॅपटॉपसह पाराजवळ येण्याची सूचना केली. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. राजपूत यांनीही संवेदनशीलपणे तेवढाच जलद प्रतिसाद देत पाराजवळ आले. त्यांना जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी सुरंजे दाम्पत्याच्या समस्येची माहिती देत प्रस्तावाची माहिती घेतली. सुरंजे दांपत्याच्या प्रस्तावावर तातडीने प्रशासकीय कार्यवाही करण्यात आली. प्रकरण अंतिम करून नजराणा भरण्यासाठी श्री. सुरंजे यांच्याकडे चलन देण्यात आले.
अशा प्रकारे जिल्हाधिकारी श्री. प्रसाद आणि निवासी उपजिल्हाधिकारी श्री. राजपूत यांच्या तत्परतेमुळे सुरंजे दांपत्याचा विषय अवघ्या काही मिनिटांत मार्गी लागला. त्यामुळे सरकारी काम आणि सहा महिने थांब हा शब्द प्रयोग विसरायला लावणारी घटना घडली आहे, अशा प्रतिक्रिया तेथे उपस्थित नागरिकांनी व्यक्त केल्या.
जिल्हाधिकारी श्री. प्रसाद हे कामाच्या बाबतीत नेहमीच तत्पर असतात. काम होणार असेल, तर लगेच त्याच्यावर कार्यवाही करतात. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्याला थेट संपर्क साधतात. दिव्यांग, वयोवृध्द व्यक्ती यांना पहिल्या मजल्यावरील जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचणे जिकिरीचे होत असे. ही गोष्ट जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांच्या लक्षात आली. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासह आवारातील लेखा भवनसाठी लिफ्ट मंजूर केले. या लिफ्टचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.





